
अहिल्यानगर (न्यूजलाईन) — भिगवण येथील कथित अपहरण प्रकरण ताजे असतानाच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस कैदेत ठेवत अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील कानडगाव येथील आदिवासी कुटुंबातील मुलगी १३ फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.
तपासादरम्यान मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण याने मुलीचे अपहरण करून तिला रामशेज किल्ला परिसरातील जंगलात नेल्याचे समोर आले. हा परिसर नाशिक जिल्ह्यात येतो. तेथे तिला कैद करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिस पथकाने कारवाई करत मुलीची सुटका केली असून मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक एकवटले असून परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेला न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.





