वंदे भारत लाईव टीव्ही न्यूज राजुरा
राजुरा :- राजुरा तालुक्यातील मौजा पंचाळा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 7 वीत शिकणाऱ्या सुनेंशी भोंगळे हिने आपल्या आई वडील, आणि शाळेतील शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग भरारी घेत राजुरा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावले असून श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रांगणात आयोजित राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनीत 407 प्रतिकृती मधून तीच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला असून शालेय शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते चॅम्पियन ट्राफी देऊन गौरविण्यात आले.
आता ती राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीत सुध्दा तीच्या प्रतिकृतीला पहिली पसंती मिळणार काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण देशात एका बाजूला महागडी फी देऊन, झगमगाटमय टुमदार शाळांमध्ये शिक्षणारी, फाडफाड इंग्रजी बोलणारी उच्चभ्रू वर्गातील मुले तर दुसऱ्या बाजूला कायमच दुर्लक्षित राहिलेल्या, सुविधेने ग्रासलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी मुले अश्या दोन गटांत आजचे शिक्षण विभागल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काहीसे कमी लेखण्याचे प्रयत्न होत असतांनाच राजुरा तालुक्यातील पंचाळा जिल्हा परिषद शाळेतील सुनेंशी विनोद भोंगळे हिने मात्र योग्य मार्गदर्शन व संधी मिळाली तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील कुठेच कमी पडत नाहीत. आपल्या कर्तुत्वाच्या बळावर ते देखील यशस्वी होऊन देशाचे नाव उज्ज्वल करु शकतात हे सिद्ध करून दाखवले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनींचे आयोजन प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. यात इंग्रजी माध्यमाच्या तसेच मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. यात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. समाजाला उपयोगी विज्ञान व तंत्रज्ञान या संकल्पनेतून अनेक प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. यात राजुरा तालुक्यातील मौजा पंचाळा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 7 वी ची कु. सुनेंशी विनोद भोंगळे या विद्यार्थ्यांनीने ‘पर्यावरणाचे रक्षण, चला करूया वृक्षारोपण’ या विषयावर टाकाऊ वस्तु पासून समाज उपयोगी टिकाऊ वस्तू कशी बनवायची यावर आधारित प्रतिकृती हिने मुख्य मार्गदर्शक शिक्षिका मोहिनी देशमुख यांच्या मार्गदर्शनात तयार करून प्रदर्शनीत ठेवली होती,.
तिच्या प्रतिकृतीने आधी तालुक्यातून नंतर जिल्ह्यातून आणि आता थेट राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला असून आता ती राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यापूर्वीही सुनेंशी भोंगळे हिने नवरत्न स्पर्धेत स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उंचावले आहे. आता पून्हा एकदा राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकावून राजुरा तालुक्यातील नागरिकांना सुखद धक्का दिला.
तिच्या या यशाबद्दल राजुरा तालुक्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील शैक्षणिक क्षेत्रातून तसेच विविध मान्यवर व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.