
अहिल्यानगर –प्रतिनधी राविराज शिंदे
आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमुळे गरीब आणि दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक ओझे सहन करावे लागत नाही, तसेच त्यांना वेळेवर आणि मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात.
धर्मादाय आयुक्तालयांतर्गत नोंदणीकृत या २५ रुग्णालयांद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना विनामूल्य किंवा ५० टक्के सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा, शस्त्रक्रिया आणि औषधे उपलब्ध करून दिली जातात. यामुळे गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक ताण पडत नाही. शासनाने निश्चित केलेल्या दरात औषधे दिली जातात, ज्यामुळे रुग्णांना परवडणारी सेवा मिळते. या रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा गरजू आणि १० टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
प्रत्येक महिन्याला आढावा बैठक
प्रत्येक महिन्याला धर्मादाय रुग्णालयांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली जाते. यावेळी रुग्णांच्या तक्रारी असल्यास त्यांचे तातडीने निराकरण केले जाते. वर्षातून तीन ते चार वेळा रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. रुग्णालयाने रुग्णांना दाखल करून न घेतल्यास नातेवाईक १८००१२३२२११ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. आतापर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही धर्मादाय रुग्णालयाविरुद्ध तक्रार नोंदवली गेली नाही, आणि सर्वत्र आरोग्य सुविधा व्यवस्थित पुरवल्या जात आहेत.
विनामूल्य किंवा नाममात्र दरात उपचार
रुग्णालयातील दैनंदिन माहिती डॅशबोर्डवर नोंदवली जाते, ज्यामुळे रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती सहज मिळते. या रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल (वार्षिक उत्पन्न १.८ लाख रुपयांपेक्षा कमी) आणि निर्धन (वार्षिक उत्पन्न ३.६ लाख रुपयांपेक्षा कमी) रुग्णांसाठी विशेष तरतूद आहे. यामध्ये संपूर्ण उपचार, शस्त्रक्रिया आणि औषधे विनामूल्य किंवा नाममात्र दरात उपलब्ध होतात.
जिल्ह्यात २५ रुग्णालये
जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांची तालुकानिहाय वितरण पुढीलप्रमाणे आहे: अहिल्यानगर शहरात ८, संगमनेर तालुक्यात ८, राहुरी, शेवगाव आणि राहाता तालुक्यात प्रत्येकी २, तर जामखेड, नेवासा आणि कोपरगाव तालुक्यात प्रत्येकी १ रुग्णालय आहे. एकूण २५ रुग्णालयांमध्ये २४० खाटा निर्धन रुग्णांसाठी आणि ४७० खाटा दुर्बल रुग्णांसाठी राखीव आहेत. या सुविधांमुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा आधार मिळत आहे.