
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे.
25-26 जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.