
नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बुधवारपासून नाशिक ते बोरीवली दरम्यान इलेक्ट्रिक बससेवा सुरू होणार आहे. मंगळवारी ठाणे येथे विविध मार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येत आहे. बुधवारपासून नाशिकमधून ही सेवा सुरू होईल.
नाशिक-बोरीवली दरम्यान धावणारी बस ३५ आसनी असणार आहे. सद्यस्थितीत नाशिक-पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू आहे. तिचा हळूहळू इतर मार्गावर विस्तार होत आहे. चांगले उत्पन्न देणाऱ्या अर्थात प्रवाशांचा प्रतिसाद असणाऱ्या मार्गावर इलेक्ट्रिक बसचा विचार होत असल्याचे लक्षात येते. या बसचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. नाशिक-बोरिवलीसाठी प्रारंभी सहा इलेक्ट्रिक बस उपलब्ध असतील. सकाळी सहापासून प्रत्येक तासाच्या अंतराने बस सोडण्याचे नियोजन आहे.
या सर्व बस नाशिक आगारातच मुक्कामी राहणार आहेत. बसला मार्गक्रमण करण्यास लागणारा वेळ आणि प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इलेक्ट्रिक बसची संख्या १५ पर्यंत विस्तारण्याची तयारी केली जात आहे. इतर मार्गावर त्या चालविण्याचा विचार केला जात आहे.