
Pune: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय वर्तुळातील वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्याचं चित्र आहे. पुणे जिल्ह्याला मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आता बळावली असून, त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यात विधान परिषद आणि विधानसभा मिळून महायुतीचे एकूण २३ आमदार आहेत. त्यापैकी ६ आमदारांकडे सरकारमधील महत्त्वाची पदे आहेत. त्यामुळे, उरलेल्या १७ आमदारांपैकी कोणाची वर्णी लागणार, याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे.
राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा असलेला पुणे, राजकीय दृष्टिकोनातून नेहमीच निर्णायक मानला जातो. उद्योग, शिक्षण, आयटी आणि नागरी विकासाच्या बाबतीत पुणे हे राज्यात अग्रस्थानी आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसह महायुतीसाठी हा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या पुणे जिल्ह्याला मंत्रिमंडळात मर्यादित प्रतिनिधित्व मिळत असल्याने, सरकारकडून पुण्याला आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार सुरू झाल्याचं समजते. पुण्यातील महायुतीचे आमदार आपापल्या गटातून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तसेच, पुण्याला अतिरिक्त मंत्रिपद मिळाल्यास शहरातील प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी हा निर्णय झाल्यास, महायुतीला पुण्यात मतदारांचा मोठा पाठिंबा मिळवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळेच या घडामोडीकडे राजकीय वर्तुळासह जनतेचेही लक्ष लागून आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचाली पाहता मंत्रिमंडळात पुण्याचे प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.