
शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडीसाठी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी – रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे
अहिल्यानगर, दि. १३ – रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व शेतीपूरक रेशीम उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी केले आहे. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होऊ शकतो. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असून कमी क्षेत्रातही जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असून अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष उत्पादनाची कामे सुरू आहेत. रेशीम उत्पादनांना दिवसेंदिवस मागणी वाढत असून शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येत आहे.
जिल्हा रेशीम कार्यालय, अहिल्यानगरमार्फत तुती लागवड रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये तुती लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती, कृषी कार्यालय अथवा जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत नोंदणी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. योजनेअंतर्गत १ एकर क्षेत्रावरील तुती लागवड व संगोपनासाठी तीन वर्षांत एकूण ८९५ मनुष्यदिवसांची मजुरी दिली जाते. २०२५-२६ च्या दरानुसार मजुरीपोटी २ लक्ष ७९ हजार २४० व साहित्यासाठी १ लक्ष ५३ हजार असे एकूण ४ लक्ष ३२ हजार २४० रुपये तीन वर्षांत अनुदान दिले जाते. यासाठी गावातील किमान ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने ग्रामरोजगार सेवकाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ५०० रुपये प्रति एकर नोंदणी शुल्क भरून नाव नोंदणी करावी व संबंधित कार्यालयाकडे मनरेगा योजनेतून अर्ज करावा.
अल्पभूधारक शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांना केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र २’ योजनेत सहभागी होता येईल. तुती लागवडीसाठी १ एकरकरिता ४५ हजार रुपये, सिंचन व्यवस्थेसाठी ४५ हजार रुपये, संगोपनगृह बांधकामासाठी २ लक्ष ४३ हजार ७५० रुपये, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रुपये व निर्जंतुकीकरण औषधीसाठी ३ हजार ७५० रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतात. सिल्क समग्र २ योजनेत २ एकर तुती लागवडीसाठीही अनुदान योजना राबविण्यात येते.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, समन्वय इमारत, पहिला मजला, पुतळा मैदान, जिल्हा परिषद बँकेशेजारी, मॅप्स कॉलनी, पाषाण लाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
#रेशीमशेती #Sericulture #MahaReshim2026 #AhilyanagarAgri #FarmerSuccess #SilkIndustry #MaharashtraGovt #AgriSubsidy #महारेशीमअभियान #तुतीलागवड #अहिल्यानगर #शेतकरी #अनुदान










