अन्य खबरेसंगमनेर

दाढ खुर्द येथे एकादशीनिमित्त १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद!

हरिनाम चिंतनातून परमसुखाची प्राप्ती: परशुराम महाराजांच्या कीर्तनाने भक्तिरसात भर

प्रतिनिधी : शहाजी दिघे

अमृतवाहिनी प्रवरेच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र दाढ खुर्द येथे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात होत आहे. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान महंत दत्तगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू आहे.

काळ सारावा चिंतने: अनर्थे महाराजांचे मंत्रमुग्ध करणारे कीर्तन

सप्ताहाच्या निमित्ताने रामायणाचार्य ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे (कोपरगाव) यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून कीर्तन सेवेचा पर्व सजवला.

संत तुकाराम महाराजांच्या ‘काळ सारावा चिंतने’ या सुप्रसिद्ध अभंगावर आधारित चिंतनातून महाराजांनी आजच्या जीवनातील ‘चिंता’, ‘अस्थिरता’ आणि ‘वेळेचा अपव्यय’ यावर मार्मिक प्रकाश टाकला. त्यांनी श्रोत्यांना स्पष्ट संदेश दिला की, “चिंता सोडा, हरिनाम घ्या, नीती–भक्ती–सदाचाराचे पालन करा. याच मार्गातून परमसुखाची प्राप्ती होते.” महाराजांच्या या प्रभावी निरूपणाने पंचक्रोशीतील हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले होते. सप्ताहातील कीर्तनाला विक्रमी गर्दी झाली होती.

विक्रमी महाप्रसाद: १५ हजार भाविकांना खिचडीचे वाटप

कीर्तनानंतर परिसरातील अनेक गावांच्या सहभागातून आमटी-भाकरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. आज, १ डिसेंबर (एकादशी विशेष) निमित्ताने दाढ खुर्द येथे साबुदाणा खिचडी पंगतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या महाप्रसादासाठी तब्बल १५ क्विंटल साबुदाणा, दहा क्विंटल शेंगदाणा आणि सहा क्विंटल बटाटा वापरण्यात येणार आहे. पंधरा हजार भाविक या खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.

दाढ खुर्द ग्रामस्थ आणि महंत दत्तगिरी महाराज यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसात सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे. हा सप्ताह शिस्तबद्ध, भव्य आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी समितीने अथक प्रयत्न केले आहेत.

Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!