
संजय पारधी चंद्रपूर
चंद्रपूर – जनतेपर्यंत योजना पोहोचवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर आपले आद्यकर्तव्य आहे. आपण शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचे खरेखुरे वाहक आहोत. त्यामुळे प्रशासन आणि जनतेमधील दरी मिटविणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून सुशाशनाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणे शक्य आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विचोडा व चांदसुर्ला गट ग्रामपंचायतच्यावतीने खैरगाव (जि. चंद्रपूर) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, भाजप महानगर महामंत्री रामपाल सिंह, अनिल डोंगरे, विचोडाच्या सरपंच माधुरी सागोरे, हनुमान काकडे, ग्रामपंचायत सदस्य संगीता हेलवडे, मुख्याध्यापक श्री. खैरकर, शिक्षक श्री. शेंडे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विचोडा व चांदसुर्ला येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती. महाराजस्व अभियानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. ज्यांनी सिंहासनावर नव्हे तर रयतेवर प्रेम केले. माझे राज्य हे रयतेचे राज्य आहे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या नावाने रयतेच्या विकासाचे कार्य सुरू आहे, याचा अभिमान आहे, अशी भावनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य, दिन-दुबळे, वंचितांचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळत आहे. जनतेला न्याय मिळवून देणे, लोकांचे प्रश्न सोडविणे यासाठी संसदीय आयुधांचा सातत्याने वापर करत आलोय. आज तर आपल्या सरकारचे काम वाघाच्या गती पेक्षा जास्त गतीने सुरू आहे. लाडकी बहीण योजना असो, सातबारा किंवा रेशन कार्ड देण्याचे काम असो. सरकार प्रत्येक टप्प्यावर गतीने काम करत आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. स्वातंत्र्यानंतर एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना कधीच घरकुले मिळाली नाहीत. सर्वांना घरकुले देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. लवकरच घरकुल योजनेत पाच ब्रास मोफत रेती मिळणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कोळसा खाणीमुळे चंद्रपूरमध्ये खूप प्रदूषण होत आहे. यासंदर्भात पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.