
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि
तपासणी प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर,(अशोक मुळे
)- जिल्ह्यात दर हजार मुलांमागे ९२७ मुली असे प्रमाण आहे. मुलींच्या जन्मदरात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली असली तरी ही वाढ समाधानकारक नाही. यासंदर्भात कायद्याच्या आधारे अपप्रवृत्तींवर कारवाई करणे व मुलींच्या जन्माबाबत समाजाची मानसिकता, दृष्टिकोन बदलवणे या गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे. तरी जनजागृती. प्रशिक्षण आणि तपासणी प्रभावीपणे राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. तसेच रुग्ण कल्याण समितीसाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिंनी निधीचे योगदान द्यावे,असे आवाहनही केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाशी संबंधित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रुग्ण कल्याण समिती, गर्भलिंगनिदान प्रतिबंधक समिती, सुमन जिल्हास्तरीय समिती अशा विविध विषयांवर आधारीत बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत बढे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, कार्यक्रम अधिकारी श्रीमती साधना गंगावणे, ॲड. रश्मी शिंदे, डॉ. प्रज्ञा सोनवणे तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अंतर्गत दि.१२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर दरम्यान जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त बाईक रॅली, १५० गावात जनजागृती, ६५० माध्यमिक शाळेत एच.आय.व्ही./ एड्स जनजागृती, ९५ महाविद्यालयीन युवक युवती यांना जनजागृती अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, रुग्ण कल्याण समितीमार्फत रुग्णांसाठी विविध सोई सुविधा राबविल्या जातात. त्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सढळ हाताने मदत करावी. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करुन लोकांचे प्रबोधन करावे. ज्या भागात जन्मदर कमी आहे त्या भागात लक्ष केंद्रीत करावे. कारणांचा शोध घ्यावा. अधिक कडक तपासणी करुन अपप्रवृत्तींवर कारवाया कराव्या. जिल्ह्यात सुरक्षित मातृत्वासाठी सुद्धा जनजागृती करावी. माता व बालकांचे आरोग्य चांगले कसे राहिल याबाबत प्रयत्न करावे,असे निर्देश त्यांनी दिले.
०००००