A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आदिवासी बचाव समिती आक्रमक

उपोषणकर्त्या भिल्ल महिलांची प्रकृती खालावली; नगर–मनमाड महामार्ग रोखण्याचा इशारा

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तहसील कार्यालयासमोर करजगाव येथील आदिवासी भिल्ल समाजातील महिलांचे सुरू असलेले उपोषण चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी बचाव समितीने रविवारी (८ फेब्रुवारी) नगर–मनमाड महामार्ग राहुरी बसस्थानकासमोर अडवण्याचा इशारा दिला आहे.

आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे यांनी सांगितले की, करजगाव येथे आदिवासी भिल्ल समाजातील महिला व पुरुषांवर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तीन दिवसांनी फिर्याद नोंदवली. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी गावात मोकाट फिरत असून फिर्यादी कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. हल्ल्यातील महिलांचे जबाब अद्याप नोंदवले गेले नाहीत, तसेच विनयभंग व जीवे मारण्याचा प्रयत्न यांसारखी गंभीर कलमे न लावता केवळ मारहाणीचे कलम लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवाजीराव गांगुर्डे, कैलास माळी, दिलीप बर्डे आणि भास्कर बर्डे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बसलेल्या महिलांची कोणत्याही अधिकाऱ्याने विचारपूस केली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने समाजात तीव्र नाराजी पसरली असून मागण्या मान्य न झाल्यास रविवारी नगर–मनमाड महामार्ग अडवून निषेध नोंदवला जाईल, असा इशाराही आदिवासी बचाव समितीने दिला आहे. या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राहुरी पोलिस प्रशासनावर राहील, असेही अहिरे यांनी स्पष्ट केले.

Back to top button
error: Content is protected !!