
पिंपरी – आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. ९६ किलो गांजा आणि २ चारचाकी वाहनांसह ६३ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर रोहकल फाटा (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.२१) दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
चाकण पोलिस ठाण्यात याबाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय पांडुरंग मोहिते (वय ३९, रा. गोवित्री, ता. मावळ, जि. पुणे) मन्साराम नुरजी धानका (वय ४०, रा. हुरेपाणी, ता. शिरपूर, जि. धुळे) तसेच एक महिला आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी ६३ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा गांजा व अन्य मुद्देमाल जप्त केला. ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा, ३ मोबाईल, २ चारचाकी वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड अणि पथक हे चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी पोलिस अधिकारी विक्रम गायकवाड आणि पोलिस अंमलदार निखिल वर्षे यांना माहिती मिळाली होती की, सिल्व्हर रंगाची टोयाटो इनोव्हा आणि पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको या दोन वाहनांमध्ये गांजा असल्याचे आढळले होते. तसेच, ही वाहने चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहकल फाटा येथून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना कळविली. त्यांनी तत्काळ २ पथके तयार करून संबंधित वाहनांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रोहकल फाटा येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान दोन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. संबंधित वाहनांमध्ये पाहणी केली असता एकूण ६ गांजा असलेली पोती आढळून आली.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे १) विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे २) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पथकामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस अंमलदार प्रदीप शेलार, किशोर परदेशी, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, निखिल वर्षे, कपिलेश इगवे, मितेश यादव, चिंतामण सुपे, सुनिल भागवत, महादेव बिक्कड तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे तसेच यांच्या पथकाने केली आहे.