
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
राजुरा : गरिबी, अडथळे, अन्याय, वीज कपात, दुकान खाली करण्याचा दबाव आणि जीवनाच्या एक ना अनेक परीक्षा झेलत राजुरा शहरातील राज संजय रामटेके या युवकाने IIT धनबाद या देशातील नामांकित शिक्षणसंस्थेत सिव्हिल ब्रँच मध्ये प्रवेश मिळवला आहे. ही बातमी केवळ एका विद्यार्थ्याच्या यशाची नसून, ती एका कुटुंबाच्या जिद्दीची आणि संघर्षाने यशाकडे नेलेल्या वाटचालीची साक्ष आहे.
राज यांनी CET परीक्षेत तब्बल 95 पर्सेंटाइल मिळवले. त्यांचे शिक्षण नारायण विद्यालय पडोली, चंद्रपूर येथे सीबीएसई (CBSE) माध्यमातून पार पडले. हीच ती काळरात्र होती – 2020-21 चा लॉकडाऊन. संपूर्ण जग ठप्प झालं होतं, शिक्षणाचे पर्याय बंद झाले होते. मात्र अशा प्रतिकूल काळातही राजने हार न मानता अभ्यास सुरू ठेवला. डिजिटल साधने नाहीत, परिस्थिती नाजूक, तरीही जिद्द कायम ठेवत आज IIT चा रस्ता गाठला.
फोटो स्टुडिओच्या भरोशावर आयुष्याचा डोलारा
राज यांचे वडील पंचशील वॉर्ड, गडचांदूर रोड, राजुरा येथे एक छोटासा फोटो स्टुडिओ चालवतात. या स्टुडिओच्या उपजीविकेवर दोन्ही मुलांचे शिक्षण चालू होते. मात्र 2021 पासून दुकानाच्या मालकाने सतत दुकान खाली करण्यासाठी तगादा लावला. दुकानासमोर मुद्दाम कार लावून अडथळा निर्माण करणे, किरकोळ कुरबुरी आणि मानसिक त्रास देणे ही बाब सुरूच राहिली. या सगळ्या त्रासांमुळे आर्थिक स्थैर्य कोलमडले.
2024 पासून दुकानाचे वीजबिल सरासरी 8 ते 9 हजार रुपये प्रतिमहिना येऊ लागले. वाढत्या खर्चामुळे वडिलांना महिन्याचे बिल भरणे शक्य झाले नाही. त्यातच दोन महिने बिले भरता न आल्याने वीज वितरण कंपनीने वीज कपात केली. अंधारात दुकान चालवायचे, फोटो स्टुडिओचा व्यवसाय टिकवायचा, आणि त्यातून शिक्षणाचा खर्च उचलायचा – अशक्य वाटणारा हा प्रवास त्यांनी शक्य करून दाखवला.
यासोबतच दुकान रिकामे करण्याचा तगादा, मानसिक तणाव, आणि उत्पन्नाची कमतरता यामुळे बँक आणि खासगी गटांकडून कर्ज घेऊन राज यांचे पुढील शिक्षण आजपर्यंत पोहचवले. शिक्षणात खंड पडू नये म्हणून घरचा संसार धोक्यात घालून, कर्जाच्या ओझ्याखाली आपले सर्वस्व पणाला लावले.
समाजाला निश्चितच प्रेरणा देणारा प्रसंग
राज संजय रामटेके यांचे IIT मध्ये पोहोचणे हे केवळ शैक्षणिक यश नाही, तर एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी आहे. वडिलांचे छोटेसे दुकान, त्यावर असलेल्या संकटांची मालिका, तरीही मुलांचे स्वप्न सोडले नाही. हे यश समाजाला शिकवण देणारे आहे – परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि कष्ट यांसमोर काहीही अशक्य नाही.
या यशामागे एक कडवट वास्तवही आहे – स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका मेहनती कुटुंबावर अन्याय झाला. वीज कपात, जागेच्या मालकाचे त्रास, यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. छोट्या उद्योजकांना संरक्षण देणं आणि त्यांच्या हक्कांची जबाबदारी प्रशासनाची असते, हे लोक विसरतात. एका सामान्य नागरिकाच्या मुलाने IIT गाठले, पण प्रशासनाने त्याच्या वाटेतील काटे वेचले का?
हा प्रश्न प्रशासन, नगरपरिषद, आणि विद्युत वितरण कंपन्यांसमोर आज उभा आहे. गरजू, प्रामाणिक नागरिकांच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहणे ही काळाची गरज आहे.
राज संजय रामटेके यांचे यश असंख्य गरजू मुलांना प्रेरणा देणारे आहे. परंतु यासोबतच प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांना एकच सवाल – “सामान्यांच्या संघर्षावरच समाज उभा राहणार का, की कधी प्रशासनही त्यांच्या मदतीस धावून येणार?”