कल्याण – कल्याणमधील गौरीपाडा येथील एक लाख २१ हजार ६०० चौरस मीटर जागेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने सीटी पार्क विकसित केले आहे. मनोरंजन, विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण यानिमित्ताने कल्याण शहराच्या वेशीवर उपलब्ध झाले आहे. मनोरंजनासाठी फिरायला कुठे जायाचे ही कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांची अडचण सीटी पार्कमुळे दूर झा्ली आहे.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे वालधुनी नदीच्या काठी टाऊन पार्क या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर सीटी पार्क विकसित करण्यात आले आहे. ६९ कोटी ६६ लाख रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. नवी दिल्लीतील मेसर्स डिझाईन ॲकाॅर्ड या समंत्रक संस्थेच्या प्रकल्प अहवालानुसार सीटी पार्कची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण शहरातील नागरिकांना आतापर्यंत काळा तलाव, दुर्गाडी गणेश घाट हीच विरंगुळ्याची ठिकाणे होती. गणेश घाट भागात आधारवाडी कचराभूमीची दुर्गंधी येत असल्याने नागरिक या भागात आरोग्याचा विचार करून पाठ फिरवतात. घरी पाहुणा आला तर त्याला फिरायला कुठे न्यायचे अशी अडचण कल्याणमधील नागरिकांची होती. ही अडचण सीटी पार्कमुळे दूर होणार आहे.