सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
प्रयत्नांना सातत्याची जोड दिली तर असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. माझ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात खेळणाऱ्या तरुण-तरुणींची मोठी फौज आहे. त्यांना मुबलक सुविधा, उच्च प्रतीचे स्टेडियम मी मिळवून देईन. २०३६ च्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये मला चंद्रपूर आणि गडचिरोलीचे वाघ बघायचे आहेत, अशी अपेक्षा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काल (बुधवार) व्यक्त केली. चंद्रपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.*
चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन व जी.एच. रायसोनी मेमोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे चंद्रपूरचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपविभागीय अधिकारी संजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, मनोज सिंघवी, लक्ष्मीकांत आर्के, संस्थेचे सचिव ज्यो एलजी चांदेकर, विश्वास देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांना प्रोत्साहित केले. आमदार मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूरचा सी चॅम्पियनचा व्हावा. जीवनात यश-अपयश, जय-पराजय येत असतो; परंतु खरा स्पर्धक तोच आहे जो पराजयानंतरही विजयासाठीचे प्रयत्न सोडत नाही. मला विश्वास आहे विदर्भातील संस्कारानुसार तुम्ही सर्व बॅडमिंटनचा उत्तम खेळ दाखवाल.’
भारत देशासारख्या बलाढ्य देशाचा ऑलिम्पिकबाबत जेव्हा विचार केला जातो तेव्हा खंत वाटते. अमेरिकेने 1900 सालापासून 2020 पर्यंत म्हणजे 120 वर्षांत 2520 आणि रशियाने 1222 पदके पटकावली. तोपर्यंत आम्ही फक्त 28 पदके जिंकू शकलो. मागच्याही ऑलिम्पिकचा विचार केला तर त्यात सातच पदकांची भर पडली. म्हणजे आतापर्यंत फक्त 35 पदकांपर्यंत आपण पोहोचू शकलो. म्हणूनच हे निराशादायी चित्र बदलण्यासाठी मी अर्थमंत्री असताना शेवटच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्टेडियम व्हावे अशी घोषणा केली. प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक स्टेडियमचे बांधकाम झालेच पाहिजे, असा आग्रह होता, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.
ऑल्पिम्पिकमध्ये भारताची ध्वजा उंचावणारा राजवर्धन राठोड याने केवळ पाच वर्षांच्या प्रयत्नात नेमबाजीत यश मिळवले. हेच यश तुम्हाला कमवायचे आहे. सर्वाधिक वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांनी वाघांसारखी कारकीर्द घडवली पाहिजे. शक्तिदायिनी माता महाकालीचा आशीर्वाद तुमच्यावर आहेत, असे सांगत आ. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
*इनडोअर स्टेडियम करणार*
आगामी काळात चंद्रपूर जिल्हा सुविधांनी सुसज्ज करणार असून, वर्षभरात 4500 लोकांना बसता येईल एवढ्या क्षमतेचे इनडोअर स्टेडियम साकारणार असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट पाहिल्यानंतर त्या चित्रपटाच्या नायकाला भेटलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, तुम्ही लक्ष्य निश्चय केले तर तुमचे यश कुणी रोखू शकणार नाही. त्यामुळे लक्ष्य निर्धारित करा. एअर कंडिशनरसाठी सोलर पॅनलची व्यवस्था करणार असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.