
सुमिता शर्मा :
महिलाचे प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात आरोग्य उत्तम राहावे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), रक्तदाब, हिमोग्लोबिन प्रमाण, थायरॉईड संप्रेरकांचे कार्य आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या महत्त्वपूर्ण घटकांवर लक्ष राहावे. गर्भधारणेपूर्वी या महत्त्वपूर्ण घटकांचे अनुकूलन व्हावे, यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रथम चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून ‘स्वस्थ जन्म अभियान’ मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत दिली.
‘माझे आरोग्य, माझ्या हाती’ या अभियानांतर्गत बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.मंगेश गुलवाडे, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट्स सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) च्या डॉ.सुनीता तांदुलवाडकर तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, गर्भधारणेच्या वेळी प्रत्येक महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी झाली पाहिजे. यासाठी गर्भवती महिलांच्या सदृढ आरोग्यासाठी फॉग्सी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘आयव्हीएचएम’ यांच्यासोबत प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि कोल्हापूरमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी. या समितीत शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि अशासकीय सदस्य म्हणून फॉग्सी आणि आयव्हीएमएमचे सदस्य घेण्यात येईल.
गर्भधारणेचा काळ फक्त नऊ महिन्यांचा प्रवास नसून गर्भधारणेपूर्वीचा कालावधी हा मातेचे आरोग्य अनुकूल करण्यासाठी आणि गर्भधारणेच्या प्रतिकूल परिणामांचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षमता निरोगी गर्भधारणा, सुरक्षित प्रसुतीसाठी महत्वपूर्ण ठरते. गर्भधारणेपूर्वी या महत्वपूर्ण घटकांचे अनुकूलन नसेल तर रक्तक्षय, गर्भधारणेदरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, अकाली प्रसूती, जन्माच्या वेळी बाळाचे कमी वजन आणि गर्भधारणेशी संबंधित इतर गंभीर समस्यांसह गुंतागुंत होण्याचा धोका संभवतो. यासाठी ‘स्वस्थ जन्म अभियान’ चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल. या अभियानाच्या यशस्वीतेनंतर ते सर्व राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिंक ओपीडी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथे स्मार्ट पीएससी करण्यात येत आहे. राज्यातील जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सर्व रूग्णालयातील पदभरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.