

प्रतिनिधी:सूर्यकांत तळखंडे
नरसाळा, खापा: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळालं असलं, तरी त्यांना खऱ्या अर्थाने स्वीकारण्याची मानसिकता अजूनही बदललेली नाही. याचाच प्रत्यय नरसाळा येथील अपात्र ठरविलेल्या महिला सरपंच सौ. ज्योती नितेश खोंडे यांना आला. आपला संघर्ष आणि व्यथा मांडताना त्यांनी, ‘राजकारण महिलांसाठी ‘काट्यांचा मुकुट’ बनले असून, सत्ता टिकू दिली जात नाही,’ असा गंभीर आरोप केला.
राजकीय कटकारस्थानाचा बळी
एका सुसंस्कृत कुटुंबातून समाजसेवेच्या उद्देशाने राजकारणात आलेल्या खोंडे यांना येथे कटकारस्थानाचा अनुभव आला. “निवडणुकीसाठी मला प्रवृत्त केले गेले. पण माझ्या विजयानंतर आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हापासूनच मला खाली खेचण्याचे षड्यंत्र सुरू झाले,” असे त्या म्हणाल्या. सरपंच आरक्षणातून मिळालेल्या संधीचा वापर करत असताना, गैरव्यवहाराला नकार दिल्याने त्यांच्यावर दबाव आणि खोटे आरोप लादले गेले.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
ग्रामपंचायत कारभाराबद्दल बोलताना खोंडे यांनी सचिवांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मजुरांना चेकने पैसे घेणे शक्य नव्हते, म्हणून त्यांना रोखीने दिले. सचिवांनी योग्य मार्गदर्शन केले नाही, पण आरोप मात्र माझ्यावर ठेवले गेले. माझी जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच सचिवांचीही होती,” असे त्या म्हणाल्या. माध्यमांनीही योग्य पडताळणी न करताच बातम्या प्रसिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केला. या अन्यायाविरुद्ध आता त्या थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागणार असून, त्या मागे हटणार नाहीत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
इतर महिला सरपंचांचाही हाच अनुभव
ज्योती खोंडे यांनी केवळ स्वतःचाच नव्हे, तर इतर अनेक महिला सरपंचांचाही अनुभव व्यक्त केला. “ही फक्त माझी समस्या नाही. महिला सरपंच पदावर टिकू नयेत यासाठी सतत दबाव आणि कटकारस्थाने सुरूच असतात. म्हणूनच राजकारणात यायचे असेल तर स्वतःच्या ताकदीवर या,” असा सल्लाही त्यांनी दिला.
सत्याचाच विजय होईल
आपल्यावर लावलेले ५६ लाख रुपयांचे गैरव्यवहाराचे आरोप त्यांनी फेटाळले. “आम्ही कष्ट करून खाणारे लोक आहोत, भ्रष्टाचार करणारे नाही. मला माझ्या प्रामाणिकतेवर आणि पक्षाकडून मिळणाऱ्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे. अखेर सत्याचाच विजय होईल,” असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला. या कठीण काळात सोबत असलेल्या समर्थकांचेही त्यांनी आभार मानले.