
समीर वानखेड़े ब्यूरो चीफ:
गडचिरोली, जिल्ह्यात कोरची तालुक्यातील नांगपूर गावाजवळील जंगलात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कथित अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी आज पहाटे सुमारास धाड टाकली. या कारवाईत ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ४ लाख ४१ हजार ५०० रुपये रोख रकमेसह २३ चारचाकी आणि ५ दुचाकी वाहनांसह एकूण १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकूण ३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार भरविल्याचा आरोप असलेले परमेश्वर लोहंबरे आणि मिथुन तांबेकर हे दोघे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. परमेश्वर लोहंबरे हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा महासचिव आहे, हे येथे उल्लेखनीय.
पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्हत, हवालदार सतीश कत्तीवार, तुषार खोब्रागडे, बापू कुम्मरी तसेच कोटगुल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक वायकर, सहायक फौजदार भजनराव कोडापे, अंमलदार संदीप बागडे व किशोर बावणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विवेक वायकर करीत आहेत.









