राजुरा :- येत्या 31 डिसेंबर 2024 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाच्या स्वागताप्रसंगी अतिउत्साही तरुण मंडळीकडून मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, असे प्रकार निदर्शनास येतात. यावर आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहे.
नववर्षाचा उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरुण मंडळी मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवतात. तसेच रस्त्यावर स्टंटबाजी किंवा अतिशय निष्काळजीपूर्व ड्रायव्हिंग करणे यासारखे कृत्य करीत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे. जर मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर Traffic Control Branch व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन Police Stations अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट, रफ ड्रायव्हिंग, स्टंटबाजी करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकावर मोठ्या प्रमाणात विशेष मोहिमेद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी कळविले आहे.