A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर


समीर वानखेडे:
राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने तयार करून सादर करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य भवन येथे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव श्री. बेंद्रे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, तसेच विविध नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात. अशावेळी संकलित होणाऱ्या रक्ताला त्वरित मागणी नसल्यास रक्त वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. त्याउलट, उन्हाळ्यात व सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्ताचा तुटवडाही जाणवतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी नवीन धोरण उपयोगाचे ठरणार आहे.

राज्यात रक्तपेढ्या स्थापन करणाऱ्या संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नवी नियमावली तयार करावी. राज्यातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये नॅट (NAT) टेस्टिंग (न्यूक्लिअरिक अॅसिड टेस्टिंग) सुरू करण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतील खारघर येथील प्रशिक्षण केंद्र आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

Back to top button
error: Content is protected !!