
समीर वानखेडे ब्यूरो चीफ:
राजुरा-चंद्रपूर परिसरातील औद्योगिक प्रदूषणाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आपण स्वतः अधिवेशनानंतर या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करू, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
याप्रकरणी माहिती घेण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांनी बोलावल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले नसल्याने हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगून तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांस निलंबित करण्याचे आदेश दिले.
सदस्य देवराव भोंगळे यांनी नांदाफाटा येथे असलेल्या सिमेंट कंपन्यांमुळे गडचांदूर येथे होत असलेल्या प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, या परिसरातील उद्योगांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित उद्योगांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रदूषणाच्या कारणांच्या प्रमाणात त्यांना दंड आकारण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. तथापि केवळ दंडात्मक कारवाईने प्रश्न सुटणार नसल्याने दंडाची रक्कम वाढविण्याचाही विचार सुरू असल्याचे पर्यावरण मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
उद्योगांमध्ये ‘कंटीन्युअस एम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम’ (सीएएक्यूएमएस) आणि ‘ऑनलाइन कंटीन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम’ (ओसीईएमएस) बसविण्यात आल्याची माहिती देत, त्याद्वारे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आदींचे प्रमाण तपासले जात असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, रोजगार आणि सीएसआरमधून विकासकामे करण्याबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे अहवाल व स्थानिक जनतेच्या तक्रारींतील तफावत दूर करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन तपास करणार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.












