
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा
चंद्रपूर :- विकासाच्या विविध निर्देशांकात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्याची दखल शासन स्तरावरून होत असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे’ विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात विविध विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या निर्देशांकाचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडले. याच कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गौडा यांना सन्मानित करण्यात आले.
चंद्रपूरने या बाबींमध्ये पटकाविला प्रथम क्रमांक कार्यात्मक एफआरयु (प्रथम संदर्भ युनीट्स्) चे प्रमाण (आरोग्य विभाग), गर्भवती महिलांमधील ॲनिमिक महिलांची टक्केवारी (आरोग्य विभाग), सबसिडी वितरणातील साधलेल्या टक्केवारीची प्रगती (कृषी विभाग), लक्ष्याच्या तुलनेत ड्रीप सिंचनासाठी डीबीटी द्वारे निधी प्राप्त करणा-या लाभार्थ्यांची टक्केवारी (कृषी विभाग), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक लेखा अहवालाची वेळेत प्रसिध्दी (चंद्रपूर महानगरपालिका), प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी (ग्रामीण विकास), सुधारीत स्वच्छता सुविधा असलेल्या कुटुंबाची टक्केवारी (ग्रामीण विकास), विशाखा तक्रारींची निस्तारणाची टक्केवारी आणि सुधारीत दुर्घटना स्थळांची टक्केवारी व सुधारणा करणे बाकी असलेली स्थळे (परिवहन विभाग) या निर्देशांकात चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.