
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
राजुरा. : बल्लारपूर येथील टिळक वॉर्डातील अल्पवयीन रणजित उर्फ कटरणी दिनेश निषाद (१७) पाच ऑगस्टपासून बेपत्ता होता. १९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याचा मृतदेह मानोली गावाजवळील शेतशिवारातील झुडपी जंगलात पूर्णपणे कंकाल अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रणजित ८ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या सात मित्रांसोबत राजुरा तहसीलमधील गौरी सास्ती परिसरातील गुप्ता कोळसा वॉशरी, वेकोली परिसरात गेला होता. मात्र, तो परत आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रणजितसोबत गेलेल्या तरुणांना चोरीच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी अटक केली.
त्यात रणजित नव्हता, परंतु त्याचा मोबाईल फोन दाऊद नावाच्या तरुणाने पोलिसांकडे जमा केला.यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर संशय व्यक्त करत सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली होती.
कुटुंबीयांनी सांगितले की, बाबापूर, कढोली, मानोली व कोलगांव परिसरात रात्रीच्या वेळी कोळसा खाणी आणि ट्रक-वाहनांमधून बॅटरी व डिझेल चोरीचे प्रकार नेहमी घडतात. या पार्श्वभूमीवर रणजितच्या गायब होण्यामागे काहीतरी गंभीर कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.
शेवटी १९ दिवसांनी रणजितचा मृतदेह मानोली शिवारातील झुडपी जंगलात आढळला. मृतदेह पूर्णतः कंकाल अवस्थेत असल्याने मृत्यूची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
या प्रकरणात सीआयडी चौकशी करावी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी कुटुंबीयांची मागणी आता आणखी तीव्र झाली आहे