
सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. सदर यात्रा 3 ते 15 एप्रिलपर्यंत राहणार आहे. या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, महाकाली मंदीर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे, मुख्य पुजारी गजाननराव चन्ने आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाकाली यात्रेकरीता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे त्यांना मंदीर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणा-या सोयीसुविधा चांगल्या असायला पाहिजे. गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी. बाहेर जिल्ह्यातून येणा-या बसेसची संख्या किती राहील, सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील, त्यांची पार्किंग कुठे केली जाईल, आदी बाबींचे योग्य नियोजन करावे. तसेच मंदीर परिसरात जाणारा मार्ग व इतर अनुषंगीक बाबी नागरिकांना क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल का, याबाबतही विचार करावा. कॉल सेंटर, पोलिस चौकी, अग्निशमन व्यवस्था 24 बाय 7 उपलब्ध ठेवावी.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच मंदीर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता, तेथे पाण्याची उपलब्धता ठेवावी. मंदीर परिसरात विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे अखंडीत सुरू असले पाहिजे. जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. तसेच येणा-या भाविकांची नोंदणी करणे शक्य असेल तर त्यांची नावे, मोबाईल क्रमांक नमुद करावा. महानगर प्रशासन, पोलिस विभाग, वाहतूक शाखा तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांनी तात्काळ मंदीर परिसराची पाहणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.