A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य -केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान


सुमिता शर्मा:
प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, हवामान अनुकूल पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन आणि बाजारपेठेतील दुवे यांचा योग्य समन्वय शेतक-यांनी राखण्याची गरज आहे. कृषी विभागानेही देशातील अनेक भागात त्या त्या हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करण्याचे निर्देश केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी विभागाला दिले. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे व आयडीशिवाय कृषी योजनाचा लाभ न देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. येत्या काळात विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.

अमरावती रोडवरील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या सभागृहात आज केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री श्री. चौहान बोलत होते. यावेळी कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान विकास रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह संबंधित विभागाचे केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान, कृषी क्षेत्रातील आव्हाने, खरीप हंगाम २०२५, खते आणि बि बियाण्यांची उपलब्धता, विकसित कृषी संकल्प अभियान, ॲग्रीस्टॅक अभियान, पुढील वर्षाचे नियोजन याविषयीची माहिती सादरीकरणाद्वारे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी दिली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. चौहान म्हणाले की, हवामान बदलानुसार तसेच पर्जन्यमानुसार पिकांचे विशेषतः राज्यातील कापसाचे वाण अधिकाधिक विकसित करण्याची गरज आहे. कमी पर्जन्याच्या प्रदेशातही अधिकाधिक पीक देणारे वाण विकसित होण्याची गरज आहे. राज्याचे ‘बेस्ट क्रॅापिंग मॅाडेल’ विकसित करण्याचे निर्देशही यावेळी मंत्री श्री. चौहान यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

राज्यातील कृषी तसेच ग्राम विकास विभागात सुरू असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बैठकीदरम्यान कौतुक केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, सँड बँक या उपक्रमांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

महाराष्ट्रातील ‘सक्सेस स्टोरीज‘ देशभर पोहोचवा

सादरीकरणादरम्यान राज्यातील विविध भागातील शेतक-यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी संभाजीनगर जिल्ह्यातील टापरगाव येथील शेतकरी रावसाहेब मोहिते, बीड जिल्ह्यातील रूई (धानोरा) येथील रेशमाची शेती करणारे शेतकरी एकनाथ टाळेकर, यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथील आर्चिडची शेती करणा-या शेतकरी वंदना राठोड यांच्या यशकथा देशभरात विविध माध्यमातून पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
केंद्र पुरस्कृत योजनाचा घेतला आढावा

केंद्रपुरस्कृत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सेल्फ हेल्प ग्रूपअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिली. मनरेगाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. यात मनरेगाच्या उद्दिष्टपूर्तीचे केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी कौतुक केले.

एक कोटी लखपती दीदींचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 1500 रुपयांचा महिलांना आधार मिळाला आहे. महिलांनी या रकमेतून विविध व्यवसाय सुरु केले आहेत. महिलांना आवश्यक खर्च भागवण्यास देखील या पैशांची मदत होत आहे. यासोबतच महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी लखपती दीदी ही योजना राबविण्यात येते. येत्या काळात एक कोटी लखपती दिदी बनविण्याचे राज्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बैठकीदरम्यान दिली.

Back to top button
error: Content is protected !!