A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

5 दिवसापासून डालमिया सिमेंट कंपनी विरोधात उपोषणाला बसलेले शेतकरी विठोबा बोंडे ची प्रकृती खालावली

प्रशासनावर चालढकलपणाचा आरोप नागरिकांचा संताप 2 हजार लोकांनी सुरू केला रास्ता रोको आंदोलन

GridArt 20250930 184849946
समीर वानखेडे :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीचे दालमिया सिमेंट कंपनीला वाटप करण्याच्या निर्णयाविरोधात २३ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आमरण उपोषणाचा सातवा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाली आहे.

ग्रामस्थांच्या मते, सांगोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता मासिक सभेत गावाच्या हक्काच्या ५० एकर जमिनीचे सिमेंट कंपनीला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याचा ठराव मंजूर केला. या निर्णयाविरोधात ग्रामस्थ संतप्त असून, त्यांनी याला सरपंचाचा भ्रष्टाचार ठरवत निषेध केला आहे.

दरम्यान, गटविकास अधिकारी, कोरपना यांनी दिनांक 26 सप्टेंबरला आदेश दिले होते की, २ ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत हा मुद्दा विषय सूचीमध्ये घ्यावा, परंतु ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांनी त्यास नकार दिला. त्यामुळे वाद अधिक तीव्र झाला आहे. गावातील शेकडो लोकांची मागणी असताना ग्रामसभा घेण्यास नकार का? हा संतप्त सवाल ग्रामवासी करीत आहे.

या आंदोलनाला चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. मात्र, तोडगा निघू शकला नाही. गटविकास अधिकारी यांनी हा विषय आपल्या अखत्यारीत नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. दुसरीकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत देत सांगोडा ग्रामपंचायतीतील अनियमिततेबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.

सरकारी गायरान जमिनींच्या वापराबाबत सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट दिशा-निर्देश असतानाही ग्रामपंचायतीने उद्योगाला जमीन दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर, गावातील सरपंचाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्याला संरक्षण मिळावे म्हणून सत्ताधारी पक्ष प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसातही उपोषण सुरूच असून, ग्रामस्थांनी वारंवार दिलेली निवेदनं धुळखात असल्यामुळेच उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये—
गावकऱ्यांना विश्वासात न घेता दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तात्काळ रद्द करावे,

ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी,

स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा
अशा मागण्या प्रमुख आहेत.

विठोबा बोंडे यांच्या प्रकृती खालावत असतानाही प्रशासनाकडून ठोस निर्णय न घेतल्याने सांगोडा गावातील अन्यायाविरुद्धची ठिणगी पेटत चालली आहे.

काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून दबावात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाने प्रशासनाने तोडगा न काढल्याने आंदोलकांनी राजुरा- आदीलाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे.
दरम्यान, उपोषणकर्ते विठोबा बोंडे ची प्रकृती सतत खालावत असून, त्यांच्या जीवाला काही अनर्थ झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!