प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, सप्तश्रृंगगड :उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सव १६ एप्रिलपासून सुरु होणार असून, यात्रेच्या उत्सवादरम्यान आठ ते दहा लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज प्रशासनातर्फे व्यक्त केला जात आहे. पिण्याच्या पाण्याची तहान कशी भागविणार, असा प्रश्न भाविकांकडून केला जात आहे.
गडाला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी तलावाने तळ गाठला असून, येथील ग्रामस्थांना चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. यात्रा उत्सवानिमित्त लाखो भाविक हजेरी लावतील. परंतु, देवी भक्तांना उत्सवात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. पाण्याची व्यवस्था प्रशासन करणार का, असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. सप्तशृंगी गडवासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. भवानी पाझर तलाव गळतीमुळे फेब्रुवारी ते मार्च महिन्यातच तळ गाठला जातो. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यानंतर येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. तलावात अल्प पाणीसाठा शिल्लक असून,त्यामुळे चैत्रोत्सवात पाण्यासाठी ट्रस्ट व ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागते. नांदुरी येथे दहा किलोमीटरवर बंधारा असून, तेथील पाण्याची पातळी कमी झाली असून, गाळ दिसू लागला आहे. त्यामुळे ट्रस्टलाही पाण्याची टंचाई जाणवत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच निमशासकीय शासकीय अधिकाऱ्यांची व चैत्रोत्सवाची आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाण्याविषयी गंभीर चर्चा करण्यात आली. यावेळी यात्रा काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
3,026 Less than a minute