
संगमनेर, (प्रतिनिधी) – गेल्या चाळीस वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर तालुक्यातील काँग्रेसला खिंडार पडले आहे. ज्या ठिकाणहून डॉ. जयश्री थोरात यांनी युवा संवाद यात्रेला सुरुवात केली त्याच ठिकाणचे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
धांदरफळ गटातील इतरही गावातील कार्यकर्ते असे निवडणुकीच्या तोंडावर सोडून जात असल्याने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ आणि साकूर गटातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नेहमीच मोठे मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना वळविणे मुश्किल होते.
आता महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील संपूर्ण तालुका पिंजून काढला असून नाराज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र करत नवीन फळी उभी केली आहे.
त्यामुळेच तालुक्यातील शेकडो लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याची प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून काँग्रेसने युवा संवाद यात्रेला सुरुवात केली, तिथेच काँग्रेसला खिंडार पडले आहे.
तालुक्यातील पेमगिरी येथे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ पाटील यांच्या उपस्थितीत अनेक काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
दिवसेंदिवस संगमनेर भाजपची ताकद वाढत असून मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते भाजपाचे सदस्य होत आहेत, अशी प्रतिक्रिया अमोल खताळ यांनी दिली.




