
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
चंद्रपूर : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी बल्लारशाह-गोंदिया या २५० कि.मी. अंतराच्या दुहेरी रेल्वे लाईनला मंजूरी दिली असून रू. ४,८१९ करोड रूपयांचा खर्च या दुहेरीकरणावर खर्च होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वेच्या सोयीसुविधांसाठी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे विद्यमान अध्यक्ष हंसराज अहीर सातत्याने प्रयत्नशील असून त्यांनी दीड वर्षांपूर्वीच या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाकरिता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडे निरंतर आग्रह धरला होता हे विशेष.
रेल्वेमंत्र्यांच्या गोंदिया-बल्लारशाह या रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणाच्या घोषणेचे हंसराज अहीर यांनी स्वागत करून त्यांचे विशेष आभार मानले आहे. या रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणामुळे विदर्भ व मराठवाडा क्षेत्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून यामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड आर्थिक विकासाला वेग येणार आहे. गोंदिया-बल्लारशाह एकेरी लाईन (सिंगल लाईन) मुळे प्रवाशांना अनेक समस्या व अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आता दुहेरी लाईनमुळे वन्यजीव, व्याघ्र प्रकल्प व पर्यटनासारख्या क्षेत्रामध्येही वाढ होणार आहे.
या लाईनमुळे कनेक्टीव्हिटीमध्येही प्रचंड वृध्दी होणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याच्या विकासालाही या दुहेरी रेल्वे लाईनमुळे गती मिळणार आहे. सदर रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणाकरिता चंद्रपूर, बल्लारशाह व अन्य जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनाद्वारेही हंसराज अहीर यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला गेला, याची दखल घेत अहीर यांनी या प्रश्नी रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड यांचेशी पत्रव्यवहार, चर्चा व वारंवार प्रत्यक्ष भेटी घेवून बल्लारशाह-गोंदिया रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणाचा निर्णय घेवून उत्तर व दक्षिणेकडील प्रवाशांना न्याय देण्याची मागणी हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने केली. याबरोबरच चंद्रपूर रेल्वे स्थानकास चांदा फोर्टला जोडण्याकरिता कार्ड लाईनची मागणीही अहीरांनी केली असून येत्या ८-१० महिन्यात हे कार्य पूर्ण होणार आहे. चांदा फोर्ट स्थानकावर प्लॅटफार्मची संख्या वाढविण्याकरिताही लवकरच निर्णय होणार आहे. चंद्रपूर रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष रमणिकभाई चव्हाण, कार्याध्यक्ष दामोदर मंत्री, सचिव नरेंद्र सोनी व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा निर्णयाबद्दल विशेष आभार मानले आहे.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.