A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

नेवासा फाटा हादरला! तीन हॉटेल-लॉजवर पोलिसांचा एकाचवेळी संयुक्त छापा; देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, मालक-व्यवस्थापकांसह १० जणांवर गुन्हा

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव 

अहिल्यानगर दि. १० मे २०२६: नेवासा फाटा परिसरात सुरू असलेल्या कथित अनैतिक देहविक्री व्यवसायावर शेवगाव व नेवासा पोलिसांनी संयुक्तरीत्या मोठी आणि धडक कारवाई करत तीन हॉटेल व लॉजवर एकाचवेळी छापे टाकून मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत महिलांना पैशाचे आमिष दाखवून व बळजबरीने देहविक्रीस प्रवृत्त करणाऱ्या हॉटेल मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह एकूण १० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणारा कायदा (PITA) १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, श्री. वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. नेवासा फाटा हद्दीतील तिरंगा लॉज, मित्रप्रेम हॉटेल आणि नामगंगा लॉज येथे महिलांमार्फत कुंटणखाना चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

 

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक तयार करून त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांच्या नोटा देत संबंधित हॉटेलमध्ये पाठवले. डमी ग्राहकांनी दिलेल्या पूर्वनियोजित इशाऱ्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिन्ही ठिकाणी एकाचवेळी धाड टाकत परिसराला वेढा घातला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधित हॉटेल परिसरात मोठी खळबळ उडाली.

 

छाप्यामध्ये हॉटेल मालक आणि व्यवस्थापक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून व दबाव टाकून देहविक्रीस भाग पाडत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून डमी ग्राहकांना देण्यात आलेल्या नोटा, व्यवहाराशी संबंधित साहित्य तसेच इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. या कारवाईदरम्यान अडकलेल्या पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर व संरक्षणात्मक प्रक्रियेसाठी नेवासा पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.

 

आरोपींमध्ये तिन्ही हॉटेलचे मालक व व्यवस्थापक यांचा समावेश असून त्यात तिरंगा हॉटेलचे प्रकाश शेंडगे व इक्बाल मंडाल, मित्रप्रेम हॉटेलचे सचिन कोळेकर व सुरेश कांबळे, तसेच नामगंगा हॉटेलचे अजय कोळेकर व अजित बर्डे यांचा समावेश आहे. याशिवाय या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या चार ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांवर मोठा आघात बसला असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी भूमिकेचे स्वागत केले आहे. अनेक दिवसांपासून या भागात संशयास्पद हालचाली होत असल्याच्या तक्रारी होत्या. अखेर पोलिसांनी अचूक नियोजन, गुप्त माहिती आणि सापळा रचून मोठी कारवाई यशस्वी केली.

 

ही मोहीम पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामहरी खेडकर, अमोल पवार, उपनिरीक्षक विकास पाटील यांच्यासह शेवगाव व नेवासा पोलिसांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. अनेक अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी व जवानांच्या सहभागामुळे ही कारवाई प्रभावी ठरली.

 

पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणातील पीडित महिलांच्या पुनर्वसनासंदर्भातही आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे समजते.

 

नेवासा फाटा येथील या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनैतिक व्यवसायांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळाला आहे.

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!