
अहिल्यानगर : प्रतिनिधी राविराज शिंदे
महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून टेम्पोसह ८ लाख १३ हजार ९२७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलिस अंमलदार गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, विशाल तनपुरे, किशोर शिरसाठ यांचे पथक नेमून
पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी रवाना केले.
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत माहिती काढत असताना १५ एप्रिल २०२५ रोजी पथकाला माहिती मिळाली की, दीपक नाना टकले व पंकज नाना टकले (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल, असा पानमसाला व सुगंधीत तंबाखू वाहनामध्ये भरून श्रीगोंदा येथून काष्टीकडे येणार असल्याची माहिती
मिळाली. त्यानुसार पथकाने काष्टी ते श्रीगोंदा रस्त्यावरील दांगड लॉन्स परिसरामध्ये सापळा रचून संशयित वाहनाचा शोध घेऊन संशयित वाहनास थांबवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दीपक नाना टकले (वय ३१), पंकज नाना टकले (वय २८, दोघे रा. इंद्रप्रस्थ पार्क, काष्टी, ता.श्रीगोंदा) असे सांगितले. पोलिस पथकाने आरोपीच्या वाहनातून विविध कंपन्यांची सुगंधित तंबाखू, मोबाईल व मोटारकार असा सुमारे आठ लाख १३ हजार ९२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी दीपक नाना टकले याने पानमसाला व सुगंधित तंबाखू अविनाश ढवळे (रा. भिगवन, इंदापूर, जि. पुणे) (फरार) याच्याकडून खरेदी केली आहे. तसेच, पानमसाला व सुगंधीत तंबाखू नौशाद सिध्दीकी (रा. साळुमाळू, पारगाव, ता. दौंड) (फरार) याच्याकडून त्याचा कामगार मिराज हमीद शेख, रा. टाकळीभिमा, ता. दौंड, जि. पुणे (फरार) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती सांगितली. ताब्यातील आरोपींविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.