A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

जिल्हा परिषद अंतर्गत कमवा व शिका योजना

कामासोबत पदवी शिक्षण पूर्ण करण्याची संधी

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा

चिंचोली :- चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय (SC / ST /VJ/NT) विद्यार्थ्यांकरीता सन 2022-23 पासून ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये पदवी शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. यंदाच्या वर्षापासून सुद्धा काही होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यानुभवावर आधारित दूरस्थ पदवी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना 3 वर्षे एखाद्या कार्यालयामध्ये पूर्णवेळ इंटर्नशिप करणे बंधनकारक असते. ही तीन वर्षाची इंटर्नशिप गरजू पात्र विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात विद्यावेतन देणारी ‘कमवा व शिका’ ही नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या वित्तीय वर्षापासून पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्फे राबविली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी 8 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 9 हजार आणि शेवटच्या वर्षासाठी 10 हजार रुपये इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल. सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बीबीए म्हणजेच Bachelor in Business Administration ही पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. तसेच 12 वी नंतरचे पदवीचे, स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जाऊन कामाला येऊ शकणारे कार्याधारीत शिक्षण हे स्वतःच्या मेहनतीच्या कमाईवर करता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 18 ते 25 वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या, संगणक आणि विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्स चा प्रभावी वापर करता येणाऱ्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती) विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 24 जुलै 2025 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/cndzpibba२०२५ ही ऑनलाईन लिंक चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!