A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

विवाह खर्च कमी करून नवरदेवाने शेतात जाणाऱ्या रस्त्याचे केले बांधकाम

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा

 

चंद्रपूर :- चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील सुसा गावात एक अनोखा विवाहसोहळा पाहायला मिळाला. या लग्नात बँड नव्हता, डीजे नव्हता, लाईटिंग नव्हती आणि हुंडाही नव्हता. लग्नाचा सगळा खर्च कमी करुन, श्रीकांत एकुडे नावाच्या या नवरदेवानं गावातील शेतात जाणारा अंदाजे 2000 फूट लांबीचा रस्ता बांधला. विशेष म्हणजे पावसाळ्यात गावकरी आणि शेतकऱ्यांना शेतात अडचण येऊ नये म्हणून त्यानं हा रस्ता बनवला. भारतात लग्न म्हटलं की, हुंडा आणि अनावश्यक खर्चाचा पूर आलेला दिसतो. काहीजण उत्साहात तर काही जण नाईलाजाने तो खर्च करत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील सुसा या छोट्याशा गावातील एका तरुणानं समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. या शेतकऱ्यानं आपलं लग्न समाज आणि निसर्गाला समर्पित केलं. श्रीकांत एकुडे नावाच्या या शेतकऱ्याने लग्नावर लाखो रुपये खर्च न करता, त्याच पैशातून गावातील शेतात जाणारा रस्ता बांधला. तर महागड्या भेटवस्तूंऐवजी नातेवाईकांकडून भेटवस्तू म्हणून रोपं मागितली. श्रीकांतने एमएससी (कृषी) शिक्षण घेतलं आहे. तो एक प्रगतीशील शेतकरी आहे. श्रीकांतने ठरवलं की, लग्न फक्त नोंदणी करून साधेपणाने पार पडावं. नातेवाईकांना फ्रिज किंवा टीव्ही भेट म्हणून देऊ नये, तर फळं आणि औषधी वनस्पती भेट म्हणून देण्याचं आवाहन त्यानं केलं. नवरदेवाच्या या खास आवाहनानंतर लग्नात 90 हून अधिक रोपं भेट देण्यात आली. यामध्ये लिची, तुती, स्टारफ्रूट, वॉटर सफरचंद, महुआ, बेल, चारोळी कवट आणि रबर यासारख्या वनस्पतींचा समावेश होता. श्रीकांतने ही सर्व झाडं नियोजनबद्ध पद्धतीने शेतात लावली. श्रीकांतचा असा विश्वास आहे की, लग्न हे केवळ दोन लोकांचं मिलन नाही, तर ते समाज आणि निसर्गाप्रती जबाबदारी पार पाडण्याची संधी देखील आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांवर स्वतः उपाय शोधले पाहिजेत.

Back to top button
error: Content is protected !!