A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना अंतर्गत गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान


सुमिता शर्मा :
इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 10 वी, 12 वीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे. संबधित विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल चालविल्या जातात. यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीसह 12 वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी 5 गुणवंत मुला-मुलींना पारितोषिक दिले जाणार आहे.

गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्यासह गुण मिळवून राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्पात प्रथम येणाऱ्या 5 मुला-मुलींना गौरविण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाचे विभागीय मंडळ नसल्याने ते वगळून राज्य शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळातील प्रत्येकी 24 गुणवंतांना 10 महिन्यांसाठी प्रतिमाह 1 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या 3 मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, 100 टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा सत्कार केला जाणार आहे.

असे मिळणार रोख पारितोषिक:

राज्यस्तरावर प्रथम क्रमांक 30 हजार, द्वितीय 25 हजार, तृतीय 20 हजार, चतुर्थ 15 हजार आणि पाचवा क्रमांकासाठी 10 हजार रुपये.

अपर आयुक्त स्तरावर प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय 10 हजार, तृतीय 7 हजार रुपये. तर प्रकल्प कार्यालय स्तरावर प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार आणि तृतीय 5 हजार रुपये देण्यात येणार आहे.

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना गुणवत्तेबाबत आवड निर्माण करण्यासाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ सुरु करण्यात आली आहे. इयत्ता 10 व 12 वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर रोख पारितोषिक देऊन सत्कार केला जाणार आहे. 100 टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळेचे मुख्यध्यापक आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!