समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण जिल्ह्यातील विविध आस्थापनांचे 5 लक्ष नागरिक / मतदार मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुक कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राकरीता दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान केले जाणार आहे. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रम स्वीप उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असून जिल्ह्यात एकाचवेळी खाजगी व शासकीय आस्थापनांचे कर्मचारी मतदान करण्याची शपथ घेणार आहे.
सदर सामुहिक प्रतिज्ञेसाठी जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विविध आस्थापनांचे कर्मचारी सज्ज झालेले असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. यात खाजगी व शासकीय महाविद्यालये/ अभियांत्रिकी महाविद्यालये / आयटीआयचे विद्यार्थी, ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ, विविध महिला बचत गट, जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांचे कर्मचारी, मनरेगा जॉबकार्डधारक मजुर व औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थांचे कर्मचारी असे एकूण 5 लक्ष मतदार यात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने विभागनिहाय व क्षेत्रनिहाय समन्वय अधिकारी यांची नेमणुक केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सामुहिक प्रतिज्ञेसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.