
पुणे: दि. १४ ऑगस्ट२०२५ राज्यात गेल्या १५ वर्षापासून माहिती अधिकाराचा वापर करून विविध घोटाळे उघडकीस आणणारे माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत एक निवेदन सादर केले आहे. वारघडे यांनी म्हणले आहेत की, त्यांचा जीव धोक्यात असूनही पोलीस संरक्षणाची वारंवार मागणी करूनही नाकारले जात आहे. भविष्यात काही अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण असेल, असा सवाल उपस्थित केला आहे.
चंद्रकांत वारघडे हे हवेली तालुक्यातील बकोरी येथील रहिवाशी असून ते माहिती सेवा समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांसरख्या विविध सामाजिक संस्थाचे संस्थापक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मुंबई उच्च न्यायालयात माझ्याकडून भ्रष्टाचारविरोधात दाखल केलेले काही खटले सुरु आहेत. मी आतापर्यंत अनेक घोटाळे बाहेर काढले असून त्यामुळे मला वेळोवेळी अनेक धमक्या येत आहेत. या धमक्याच्या पार्श्वभूमिवर मी पूर्वी तीन वर्ष पोलीस संरक्षणाखाली होतो. मात्र ते अचानक काढून घेण्यात आले. चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले की, पोलीस संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासह स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये वेळोवेळी अर्ज केले जबाब दिले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली. तरीदेखील त्यांचे अर्ज वारंवार फेटाळले गेले. त्यामुळे ते आता पोलीस संरक्षणाची मागणी करत नसून, भविष्यात त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबियांवार हल्ला झाला तर त्याची जबाबदारी पुणे पोलीस आयुक्त, पोलीस संरक्षण घटित समितीतील सदस्य, झोन ४ चे पोलीस उपायुक्त, तसेंच वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर राहील, असा इशारा त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.