
अहिल्यानगर: शहाजी दिघे
अहिल्यानगर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्या विद्यापीठाच्या वतीने आयोजित “आदर्श शिक्षिका पुरस्कार” सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १०० आदर्श शिक्षिकेंचा फेटे बांधून व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या भव्य सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. कल्पना सरोज उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी अनुभव उपस्थितांसमोर मांडले. तसेच, संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष आणि जय हिंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी अध्यक्षपद भूषवले.व्यासपीठावर सौ.विद्याताई गुंजाळ ह्याही उपस्थित होत्या.
हा भव्य सोहळा यशोदीप सेलिब्रेशन हॉल, घुलेवाडी येथे मोठ्या दिमाखात पार पडला. व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. हर्षवर्धन गुंजाळ यांचीही या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शिक्षिकेंच्या योगदानाचा गौरव करत समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. कल्पना सरोज या भारतीय उद्योग क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभं राहत त्यांनी यशाचा शिखर गाठलं. आपल्या जीवनातील चढ-उतार आणि संघर्षांच्या कथा सांगत त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केलं. प्रगतीत जात आडवी येत नाही. जिद्द महत्वाची .असे त्या म्हणाल्या.विशेषतः महिलांनी कधीही हार न मानता संघर्ष करत पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. दुर्गाताई तांबे यांनी विद्या विद्यापीठाच्या कार्याची स्तुती करत संस्थेच्या योगदानाचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रात महिलांची भूमिका वाढत असल्याचे नमूद करत, शिक्षिकांना समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचे आवाहन केले.
डॉ.हर्षवर्धन गुंजाळ यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली.तसेच या पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजकत्व व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट ने केले.
डॉ. नामदेव गुंजाळ यांनी संस्थेची संकल्पना कशी सुचली आणि तिला यशस्वीतेकडे कसे नेले, याची माहिती दिली. संस्थेचा उद्देश केवळ परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा नसून त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी सक्षम बनवणे हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात १०० आदर्श शिक्षिकेंना सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ . नामदेवराव गुंजाळ यांनी अभिनंदन केले व पुरस्कारार्थी शिक्षिकेंच्या कार्याची माहिती असणारी स्मरणिका प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला.या शिक्षिकेंनी केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणच दिले नाही, तर त्यांना जीवनाचे धडेही दिले आहेत. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
उपस्थित मान्यवरांनी विद्या विद्यापीठाच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशाच प्रकारे गुणवंत शिक्षिकांचा सन्मान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
हा सोहळा शिक्षिकेंच्या कार्याचा गौरव करणारा तसेच नवीन पिढीला प्रेरणा देणारा ठरला. शिक्षण क्षेत्रात महिलांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांना योग्य तो सन्मान मिळावा, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश सफल झाला.व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट फौंडेशनची विद्यार्थीनी कु.साईली कुलकर्णी हिने इयत्ता दहावीत १०० टक्के गुण मिळविले म्हणून डॉ. पद्मश्री कल्पना सरोज यांच्या शुभहस्ते तीचा सन्मान करण्यात आला