
समीर वानखेडे :
हैदराबाद स्टेट गॅझेटिअरनुसार बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट असून, त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर जिल्ह्याचे भटके विमुक्त जमातीचे अध्यक्ष हितेश चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर केले.
निवेदनात चव्हाण यांनी नमूद केले आहे की, ऐतिहासिक आणि प्रशासकीय दस्तऐवजांमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असल्याचे स्पष्ट असूनही अद्याप त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
चव्हाण यांनी सांगितले की, “हैदराबाद स्टेट गॅझेटिअर ही एक अधिकृत ऐतिहासिक कागदपत्र आहे. यामध्ये बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीतील वर्गीकरणाची स्पष्ट नोंद आहे. तरीसुद्धा आजवर या समाजाला न्याय मिळालेला नाही. ही बाब गंभीर असून सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.”
या निवेदनाद्वारे त्यांनी मुख्यमंत्री व शासन प्रशासनाकडे आग्रह धरला आहे की, बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून त्यांना त्या अनुषंगाने आरक्षणाचा लाभ दिला जावा. करिता निवेदन देण्यात आले.









