A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र
Trending

विशेष वृत्त जिल्ह्यातील ४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा लाभ !

विशेष वृत्त जिल्ह्यातील ४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा लाभ !

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव ‌.

आश्रमशाळा योजना – विमुक्त व भटक्या जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रकाश किरण

 

अहिल्यानगर, दि.३ : महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘आश्रमशाळा योजना’ ही जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाची प्रभावी पायरी ठरत असून, सध्या या योजनेअंतर्गत ४ हजार ७०३ विद्यार्थी निवासी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देत ही योजना त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने ‘ज्ञानदीप’ ठरली आहे.

 

विमुक्त व भटक्या जमातीतील मुला-मुलींना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास साधावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या २६ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी ७ प्राथमिक, १६ माध्यमिक आणि ३ उच्च माध्यमिक आश्रमशाळांचा समावेश आहे.

 

लाभाचे स्वरूप

 

विद्यार्थ्यांना निवास, भोजन, वस्त्र, शिक्षणसाहित्य, वैद्यकीय सुविधा अशा सर्व मूलभूत गरजा शासनामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. आश्रमशाळा चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दरमहा दरडोई निवासी विद्यार्थ्यांप्रमाणे रु. २,१०० इतके परिपोषण अनुदान देण्यात येते. तसेच मान्य निवासी कर्मचाऱ्यांवर ८ टक्के व १२ टक्के वेतनेतर अनुदान आणि इमारत भाडे देण्यात येते.

 

विजाभज आश्रमशाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीच्या दृष्टीने ‘निपुण भारत’ योजनेंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व भविष्यवेधी शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आश्रमशाळांमध्ये निवासी विद्यार्थ्यांबरोबरच अनिवासी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

 

विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल

 

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या योजनेमुळे आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव व्यक्त केले आहेत. “आमच्या गावात माध्यमिक शाळा नव्हती, पण आश्रमशाळेत दाखल झाल्यानंतर मला चांगले शिक्षण, भोजन आणि सुरक्षित राहणी मिळाली. शासनाच्या या उपक्रमामुळे आज मी उच्च शिक्षण घेत आहे,” अशी भावना एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

 

सर्वांगीण विकासाचे माध्यम

 

सहाय्यक संचालक (विजाभज) श्री. विनोद लोंढे म्हणाले, “आश्रमशाळा योजना ही केवळ शिक्षणपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम ठरली आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आज उच्च शिक्षण, क्रीडा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.”

 

एकूणच, सामाजिक न्याय व समान संधीचे प्रतीक ठरलेली ‘आश्रमशाळा योजना’ आज जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवित आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना म्हणजे शिक्षणाच्या दिशेने झेप घेण्याचा आशेचा किरण ठरली आहे.

 

#आश्रमशाळा_योजना

#विमुक्त_भटक्या_जमाती

#शिक्षणाचा_प्रकाशकिरण

#ज्ञानदीप

#सामाजिक_परिवर्तन

#ग्रामीण_शिक्षण

#सर्वांगीण_विकास

#महाराष्ट्रशासन

#विजाभजविभाग

#अहिल्यानगर

#विद्यार्थ्यांचा_उमेदवार_उद्याचा

#EducationForAll

#TransformingLives

#SocialJustice

#InclusiveEducation

Back to top button
error: Content is protected !!