
अहिल्यानगर : प्रतिनिधी राविराज शिंदे
पुढील पाच वर्षांसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. प्रवर्गनिहाय राखीव अथवा खुल्या पदाच्या जागा निश्चित करून लवकरच उपविभागीय पातळीवर महिला सरपंच सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाच्या तहसीलस्तरावर ईश्वरी चिठ्ठया काढण्यात येणार आहेत. सध्या जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून आरक्षणासंबंधीचा तपशील जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी पाठवला असून, दि. २४ व २५ एप्रिलपर्यंत आरक्षणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
२०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत नगर जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील १ हजार २२३ ग्रामपंचायतींपैकी ६२४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात ३१२ ठिकाणी
महिलांचा समावेश असणार आहे. यासह ३३० ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसाठी सरपंच पदाचे आरक्षण राहणार असून, यात १६५ महिलांना संधी मिळणार आहे. तर ११९ ठिकाणी एसटीसाठी आरक्षण राहणार असून, यात ६० ठिकाणी महिला तसेच १५० ठिकाणी एससी प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून, यात ७५ महिला सरपंचांचा समावेश राहणार आहे.
सध्या शासनाकडून तालुका व गावनिहाय महिला, सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण काढण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत विभागाने निश्चित केली आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर २४ आणि २५ एप्रिल रोजी उपविभागीय आणि तहसील कार्यालय स्तरावर सरपंच पदाची सोडत होणार आहे.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.