
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
चंद्रपूर : जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.
या आढावा बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपविभागीय अधिकारी संजय पवार (चंद्रपूर), रवींद्र माने(राजूरा), अजय चरडे(मुल), चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, मुल तहसीलदार मृदुला मोरे, बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे, पोंभूर्णा तहसीलदार रेखा वाणी, मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मुलचे मुख्याधिकारी संदीप दोडे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते, मतदारसंघातील सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी आदिंची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुल तालुक्यातील बोरचांदली व पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे आदी गावांतील पाणीटंचाई विषयी आलेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करावी. पाणी टंचाईच्या काळात पोंभुर्णा तालुक्यात मोठ्या विहिरीचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन आमदार निधीतून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.
मुल तालुक्यातील उमा नदीतील पाण्याच्या अभावामुळे भेजगाव व चिचाळा गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना कराव्यात. पाणी पिण्यास अयोग्य असल्यास त्या ठिकाणी दवंडी देणे, सूचना फलक लावणे, पाण्याची तपासणी करणे व बोरींगला लाल रंग देणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मतदारसंघातील चार तालूक्यातील खाण परिसरात पाण्याचा सर्वे करून मागील 10 वर्षांचा जलस्तर तुलनात्मक तक्त्यात मांडावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरो मशीन बसवण्यात आल्या असून, त्या बंद राहू नयेत यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश संबधित तहसीलदार व बीडीओंना देण्यात आले. सदर आरओ मशीन पूर्ववत सुरू करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असेही ते म्हणाले.
महावितरण विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना अद्याप विद्युत कनेक्शन दिले नसल्याचे निदर्शनास आले. तात्काळ विद्युत कनेक्शन तातडीने देण्याचे निर्देश आमदार श्री. मुनगंटीवार यांनी दिले. त्यासोबतच, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चार तालुक्यांतील ज्या गावांना महावितरणने अद्याप विद्यूत कनेक्शन दिलेले नाही अशा गावांची यादी तयार करावी. जिल्ह्यात पाणी तपासणीच्या 6 प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. एका प्रयोगशाळेतून दैनंदिन 50 याप्रमाणे तिनशे सॅम्पल पाणी तपासणी केली जाते. दूषित, फ्लोराईडयुक्त किंवा औद्योगिक प्रभावामुळे खराब झालेले पाणी असलेल्या गावांची यादी तयार करून त्या ठिकाणी बोर्ड लावावेत. प्रत्येक पंचायत समिती व तहसील कार्यालयात पाणीटंचाई व रोजगार हमी योजनेसंदर्भात तक्रार पेटी लावून तक्रारींवर 48 तासात निपटारा करण्याच्या सूचना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले, रोजगार हमी योजनेतील मजुरांची मजूरी नोव्हेंबर 2024 पासून अद्याप न मिळाल्याची बाब गंभीर असून, 45 कोटी रुपयांहून अधिक मजुरांची मजुरी प्रलंबित आहे. यासंदर्भात मजुरांची संख्या, प्रलंबित रक्कम व कायदेशीर तरतुदींचा सविस्तर तपशील संबंधित विभागांनी तयार करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर आणि चंद्रपूर तालुक्यांतील पाणीटंचाई व रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक पार पडली. बैठकीत पाणीटंचाईच्या तातडीच्या उपाययोजनांपासून ते जलजीवन मिशनअंतर्गत वीज जोडणी, नवीन विहीरींची आवश्यकता, पाणी तपासणी च्या प्रयोगशाळा कार्यक्षमतेसह, रोजगार हमी योजनेतील प्रलंबित मजुरीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाला विविध ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.