नाशिक/देवळा, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : तालुक्यातील गिरणारे येथील भिका ठमा खैरनार, रमेश राजाराम खैरनार व बाजीराव निंबा गांगुर्डे यांनी अत्यंत कठीण समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर त्यांनी नर्मदा परिक्रमेचा ३२०० किलोमीटरचा पायी प्रवास ८६ दिवसात पूर्ण केला. यात्रा झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीचीही परिक्रमा पूर्ण करून गिरणारे गावात आगमन केले. याप्रसंगी गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करून कुंभार्डे बारी ते गिरणारे गावातील श्रीराम मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
साधारणतः ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यांनी रोज ४० ते ५० किलोमीटरचा पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगण्याची कला नर्मदा परिक्रमेचा प्रवास आपल्याला शिकवतो. आयुष्य बदलून टाकणारा हा अनुभव आहे. असे भिका महाराज यांनी सांगितले. श्रीराम मंदिरात महाप्रसाद वाटप करून समारोप करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर माऊली, रणादेवपाडे, चंद्रकांत महाराज डोंगरगाव, माणिक खैरनार, राजेंद्र खैरनार, प्रभाकर खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.