
वणी – येथील प्रतिष्ठित न्यू व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज हर्षोल्लासात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संस्थापक मा. ॲड. अरुणजी बोबडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. याप्रसंगी शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सारिकाजी बोबडे, संचालक श्री. सचिनजी कुचनकार, श्री. शुभम जी बोबडे, श्री. प्रफुल महारतळे आदी मान्यवर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजारोहण नंतर वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीतचे गायन करण्यात आले. शाळेतील गीतमंचच्या चमूने देशभक्तीपर गीते सादर करीत सर्वांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कवायतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ध्वजारोहण समारोहाचे अध्यक्ष ॲड .श्री. अरुणजी बोबडे यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकीत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून दिली आणि आजच्या पिढीला स्वातंत्राचे संवर्धन करण्यासाठी पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे संचालन सौ. रेखा गुरनुले, प्रास्ताविक प्रफुल महारतळे तसेच आभार योगेश्वरी पिंपळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी परिश्रम घेतले.




