
प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
आजच्या दैनिक दिव्य वतन मधील माझा स्तंभ
‘आरसा’…
राजकारणी शंकराचार्य !
————
——————-
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार विश्वासघातानं पाडण्यात आलं. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री झालेलं मला पाहायचं आहे, असे उद्गार उत्तराखंडातील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मातोश्री बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना काढले. हिंदू धर्माच्या सर्वोच्च पीठाधीशानं असं नेत्यासारखं राजकीय विधान करावं का, हा आता वादाचा मुद्दा बनला आहे.
पुन्हा मुख्यमंत्री व्हा, पंतप्रधान व्हा… असा आशीर्वाद देणं वेगळं आणि थेट राजकीय घडामोडींवर भाष्य करणं वेगळं. प्राचीन काळापासून हिंदूंचे धर्मगुरू, ऋषिमुनी, संत राजसत्तेचे मार्गदर्शक राहिले आहेत. परंतु त्यांनी राजकारणात कधी ढवळाढवळ केली नाही. फारतर सूचक सल्ले दिले. पण, येथे तर शंकराचार्य सरळ सहभागी होत आहेत, एक बाजू उघडपणे घेत आहेत, दुसऱ्या बाजूवर आरोप करीत आहेत. हा धर्माचार्यांचा विषय तरी आहे का, असाही मुद्दा उपस्थित झाला आहे.
2019 मध्ये भाजपानं अर्धकाळ मुख्यमंत्रिपद न देणं आणि 2022 मध्ये शिवसेना बंडखोरांनी ठाकरे सरकार पाडणं, या दोन्ही घटनांना विश्वासघात ठरवून शंकराचार्यांनी भाजपा आणि शिवसेना (शिंदे) या दोघांच्याही राजकारणात हस्तक्षेप केला, असंच कोणीही म्हणेल. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी असताना, आज हिंदुत्वापासून दूर गेलेल्या शिवसेनेचा (उबाठा) पुळका शंकराचार्यांना कसा काय आला, असा प्रश्न सर्वसामान्य हिंदू जनमानसाला पडलेला दिसत आहे.
याचं कारण, शंकराचार्यांनी यात केलेलं राजकारण ! हिंदू धर्मात विश्वासघाताला सर्वात मोठं मानलं जातं, तसंच जनतेनं ज्याला बहुमत दिलं त्याला पूर्णवेळ राज्य करू दिलं पाहिजे ही त्यांची दोन्ही विधानं किती पक्षपाती आहे पाहा.
प्रत्यक्षात विश्वासघात कोणी केला ? भाजपा आणि शिवसेना यांच्या निवडणूकपूर्व युतीला बहुमत मिळूनही, ते सरकार बनवण्याऐवजी जनमत कौलाच्या विरुद्ध जाऊन आणि विरोधकांशी हातमिळवणी करून स्वत:चं सरकार कोणी आणलं ? हा युतीशी, जनतेशी विश्वासघात नव्हता ? जनतेच्या मनात नसलेलं हे सरकार शिवसेना (शिंदे) आणि भाजपानं मिळून पाडलं आणि मूळ कौल पुन:प्रतिष्ठित केला असेल तर तो विश्वासघात कसा ? उलट, शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणं जनमताच्या कौलाचा आदर 2019 मध्येच होऊन भाजपा-सेना युतीचं सरकार आलं असतं तर ते आपोआपच 5 वर्षे चाललं असतं. (आणि कदाचित तडजोड होऊन नंतरची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदही शिवसेनेच्या पदरात पडू शकलं असतं !) ते मार्ग बंद करून शिवसेनेनं केवळ मुख्यमंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वासघात केला आणि जनमानसाचा अपमानही केला, हे शंकराचार्यांना दिसत नाही का ?
जो विश्वासघात करे, वो हिंदू नही हो सकता, असंही शंकराचार्य म्हणाले. आता त्यांनीच सांगावं- वरील प्रकरणात विश्वासघातकी कोण अन् कोण हिंदू नाही ते ! मोदींना अडवण्यासाठी, एकगठ्ठा मतांच्या लोभानं हिंदूंना हिणवत अहिंदूंच्या मागे धावणारे खरे हिंदू की हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाम राहून कमी जागा पदरात पाडून घेणारे सच्चे हिंदू ? हिंदू धर्माचार्य असूनही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींना हा फरक (खरं म्हणजे विवेक !) करता येत नसेल तर, हिंदूंचं काही खरं नाही राजेहो ! धर्मकारण करणाऱ्यांनी राजकारणात लुडबुड केली की त्यांच्या हातून असाच अधर्म घडतो !!
@विनोद देशमुख
[19/07, 1:11 pm] +91 98505 87622: आजच्या दैनिक दिव्य वतन मधील माझा स्तंभ ‘आरसा’…
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर





