
पिंपरी-चिंचवड: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांसाठी ‘प्रतिभा सेतू’ ही योजना राज्यात लागू करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे MPSC च्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वी, नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानही आमदार गोरखे यांनी हा महत्त्वाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले होते.
आमदार गोरखे यांनी आपल्या निवेदनात या योजनेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ‘प्रतिभा सेतू’ या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या परंतु काही कारणांमुळे अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती संकलित केली जाते. ही माहिती एक पोर्टल तयार करून सरकारी, खाजगी आणि इतर संस्थांना उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे या पात्र उमेदवारांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरीच्या संधी मिळतात. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असतात आणि दरवर्षी हजारो विद्यार्थी राज्यसेवा, गट ब आणि गट क परीक्षांमध्ये सहभागी होतात. त्यापैकी, मुख्य परीक्षा किंवा मुलाखत देऊनही अंतिम निवड न झालेल्या विद्यार्थ्यांकडे दर्जेदार शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कौशल्ये असतात. या उमेदवारांची माहिती एकत्र करून एक पोर्टल तयार केल्यास, ही माहिती खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर सहकारी संस्थांसोबत शेअर करता येईल. याचा उपयोग तात्पुरत्या किंवा प्रकल्पाधारित भरतीमध्ये होऊ शकतो, ज्यामुळे या तरुणांनी घेतलेली मेहनत आणि जर वयाची मर्यांदा निघून गेली असलेल तर त्यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते.
या योजनेमुळे राज्यातील सामाजिक समता, प्रशासकीय प्रतिनिधित्वाची संधी आणि युवा सक्षमीकरणाला मोठा हातभार लागेल, असा विश्वास आमदार गोरखे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे हजारो होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा गोरखे यांनी व्यक्त केली आहे.